मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करा; नागरिकांसाठी चालण्यायोग्य पदपथ तयार करा : आयुक्त अश्विनी भिडे यांचे २६ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना निर्देश
"रिकामे आणि सुस्थितीत असलेले पदपथ हे एका चांगल्या शहराचे वैभव- अश्विनी भिडे ( मुंबई महानगर पालिका आयुक्त)

मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करा; नागरिकांसाठी चालण्यायोग्य पदपथ तयार करा : आयुक्त अश्विनी भिडे यांचे २६ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना निर्देश
मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शहरातील सर्व २६ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तातडीने हटवून ते नागरिकांसाठी चालण्यायोग्य करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आयुक्त भिडे यांनी सांगितले की, “रिकामे आणि सुस्थितीत असलेले पदपथ हे एका चांगल्या शहराचे वैभव असते. मुंबईतील सुमारे ५० टक्के नागरिक दररोज पायी प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी पदपथ अतिक्रमणमुक्त असणे अत्यावश्यक आहे.”
https://x.com/mybmc/status/2083510634508104023?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2083510634508104023%7Ctwgr%5E067e3579173be01860c541308be5b171b1ef04bd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.freepressjournal.in%2Fmumbai%2Fashwini-bhide-directs-bmc-assistant-commissioners-to-clear-footpath-encroachments-across-mumbai
याअंतर्गत शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बस स्थानके तसेच प्रमुख बाजारपेठांच्या परिसरातील पदपथांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे, नियमबाह्य रॅम्प आणि इतर अडथळे तातडीने हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरात स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून शहरातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे आणि कचऱ्याची संवेदनशील ठिकाणे कायमस्वरूपी हटविणे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज पालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी, पदपथ अतिक्रमणमुक्त करणे आणि शहरातील स्वच्छता अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईतील पादचाऱ्यांना अधिक सुरक्षित, मोकळे आणि स्वच्छ पदपथ उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Slug: mumbai-footpath-encroachment-removal-ashwini-bhide-directives
Tags:
मुंबई महापालिका, अश्विनी भिडे, पदपथ अतिक्रमण, BMC, मुंबई बातम्या, फेरीवाले, स्वच्छ मुंबई, घनकचरा व्यवस्थापन, मुंबई उच्च न्यायालय, पादचारी सुरक्षा



