खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावणाऱ्यांवर कारवाई; महाराष्ट्र पोलिसांचे सर्व जिल्ह्यांना आदेश
'पोलीस' नावाचा गैरवापर थांबणार! लाल पाटी लावून फिरणाऱ्या खासगी वाहनांवर कठोर कारवाईचे आदेश आता कारवाई होणार का फक्त कारवाईचा दिखावा?

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावणाऱ्यांवर कारवाई; महाराष्ट्र पोलिसांचे सर्व जिल्ह्यांना आदेश
मुंबई | प्रतिनिधी

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावून फिरणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा इतर व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलिसांना दिले आहेत.
३१ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावलेल्या खासगी वाहनांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा वाहनांमधून बेकायदेशीर कामे तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, उच्च न्यायालयानेही अशा प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली असून, ‘पोलीस’ अशी लाल पाटी लावल्यामुळे अनेकदा वाहनांची तपासणी टाळली जाते. त्यामुळे काही समाजकंटक या सुविधेचा गैरफायदा घेत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
यामुळे राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना ‘पोलीस’ नावाची लाल पाटी लावलेली खासगी वाहने आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील संबंधित तरतुदींनुसार तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही कारवाई करण्याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस विभागांना पाठविण्यात आले असून, अशा वाहनांवर आता राज्यभर विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



