‘स्टँडिंग’मध्ये आता ‘अंडरस्टँडिंग’ नाही; मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची स्पष्ट भूमिका
मुंबईकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार

मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप होत असताना, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीनेच चालेल; पूर्वीप्रमाणे कोणत्याही प्रकारची ‘अंडरस्टँडिंग’ होणार नाही, असे साटम यांनी ठामपणे सांगितले.

महापालिकेतील काही अधिकारी, विरोधी पक्षातील नगरसेवक किंवा नेते यांच्या माध्यमातून जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा साटम यांनी केला. काही जण आपल्या नेत्यांची भेट घेऊन पूर्वीचे व्यवहार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, मुंबईकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले जाईल आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या सहा महिन्यांत महापालिकेतील सुमारे ९०० कोटी रुपयांची कंत्राटे रद्द करण्यात आली असून, महापालिकेचे नवे पोर्टल आणि इतर पारदर्शक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्याचेही साटम यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये कोणताही अंतर्गत वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम करताना मतभेद होणे स्वाभाविक आहे; मात्र वेगवेगळी मते असणे म्हणजे वाद किंवा खडाजंगी नव्हे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महापौर रितू तावडे यांच्या कारभाराबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही साटम यांनी भाष्य केले. महापालिकेच्या कामकाजात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय आवश्यक असून, एखाद्या विषयावर मतभेद असले तरी त्याला राजकीय वादाचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे त्यांनी सूचित केले.
‘झारीतील शुक्राचार्य’ या त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना साटम यांनी हा शब्दप्रयोग महापौरांच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संदर्भात केल्याचे सांगितले.
महापालिकेतील जुन्या पद्धतीला पूर्णविराम देत पारदर्शक कारभारावर भर देण्याची भूमिका साटम यांनी घेतल्याने आगामी काळात स्थायी समितीतील निर्णयप्रक्रिया, कंत्राटे आणि प्रशासनातील समन्वय याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.



