पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्ह्याचा तीव्र निषेध
सीईओपी प्रशासनाकडून गुन्हा दाखल; पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह
मुंबई – एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार मंदार गोंजारी यांनी सीईओपी परिसरात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची बाजू आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वृत्तांकनावरून सीईओपी प्रशासनाने पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची बाब समोर आली आहे.
मंदार गोंजारी हे भारतातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित पत्रकार असून, निर्भीड आणि उत्तम वार्तांकनासाठी त्यांची ओळख आहे. अन्यायग्रस्तांचा आवाज माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या अडचणींवर पत्रकाराने प्रश्न उपस्थित करणे, त्यांची बाजू जाणून घेणे आणि वस्तुस्थिती समोर आणणे हा पत्रकारितेचा मूलभूत भाग आहे. अशा वार्तांकनामुळे प्रशासनाने पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करणे ही बाब चिंताजनक असून, यामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.
सत्ताधारी किंवा प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे कारवाई होत असेल, तर लोकशाही व्यवस्थेत माध्यमांच्या भूमिकेवरच गदा येण्याची शक्यता आहे. सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या निर्भीड पत्रकारितेची भीती वाटू लागली आहे का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांना त्यांचे कर्तव्य बजावताना दबाव, दडपशाही किंवा गुन्हे दाखल करण्याच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न योग्य नाही. पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तीव्र शब्दांत निषेध असून, पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
निर्भीड पत्रकारितेच्या लढ्यात आम्ही मंदार गोंजारी यांच्या पाठीशी आहोत.
#WithYouMandarGonjari
#JournalismIsTheFourthPillar
#PressFreedom
#पत्रकारितेचेस्वातंत्र्य



