आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

माळशिरस तालुक्यात जन्म घेतलेल्या अधिकाऱ्यांचा एक अभिनव उपक्रम राज्यातील भूमिपुत्र अधिकाऱ्यांना देणार प्रेरणा

माळशिरस तालुक्यात जन्म घेतलेल्या अधिकाऱ्यांचा असाही उपक्रम
राज्यातील भूमिपुत्र अधिकाऱ्यांना प्रेरणा


मुंबई,दि. (राजा माने) ज्या गावात आपण जन्मलो वाढलो आणि अधिकारी झालो त्या भागासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून माळशिरस तालुक्यात जन्म घेतलेल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी एक अभिनव उपक्रम घेतला. राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या अधिकाऱ्यांना आपल्या भागात असेच उपक्रम सुरु करण्याची प्रेरणा हा उपक्रम देईल. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जन्म घेतलेले अनेक अधिकारी देशभरात व राज्यात विखुरलेले आहेत.

ज्या भागातून आणि गावातून आपण आलो त्या गावात तिथल्या गरजेनुसार आपणही काहीतरी केले पाहिजे व भूमिपुत्र म्हणून कर्तव्य बजावले पाहिजे ही निरपेक्ष भावना प्रत्येक अधिकाऱ्यांमध्ये असते. परंतु हे काम कशा पद्धतीने पुढे न्यायचे याचा मार्ग मात्र सापडत नसतो. तालुक्यात जन्म घेतलेल्या सर्वच अधिकाऱ्यांचे संघटन करून लोकोपयोगी काम उभे राहू शकते, हे तत्त्व उराशी बाळगून माळशिरस तालुक्यातील विश्वास पांढरे (आय.पी.एस.), सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, बाळासाहेब वाघमोडे-पाटील(आय.पी.एस),संजय खरात (आय.पी.एस.गुजरात), धनंजय मगर (आय.एफ.एस., ओरिसा),सागर मिसाळ (आय.ए.एस.),शुभम जाधव (आय.ए.एस.) या अधिकाऱ्यांनी स्थानिक समाजसेवींच्या सहकार्याने अराजकीय उपक्रम हाती घेतला आहे.

स्पर्धा परीक्षा आणि करियर संदर्भात तालुक्यातील मुला-मुलींनी आधार देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत “ज्ञानसेतू” नावाने या अधिकाऱ्यांचे प्रतिष्ठान अधिकृतपणे जन्म घेण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याचे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत माळशिरस येथे होत आहे.

या घटनेला व्यापक सामाजिक अर्थ आणि महत्त्व आहे. छोट्या उपक्रमाने अनिवासी अधिकाऱ्यांच्या सहभागाने सुरू झालेले काम पुढे मोठी गती घेत असल्याचा अनुभव महाराष्ट्राने अनेक गावांमध्ये घेतलेला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान तालुक्यात जन्म घेतलेल्या अनिवासी अधिकाऱ्यांच्या प्रेरणा आणि सहभागाने सात वर्षांपूर्वी सुरू झाले होते. दररोज ३०० वृध्द निराधारांना दोन वेळचे जेवण घरपोच देण्यापासून ते “जिथे कमी तिथे आम्ही” या तत्त्वांने हे प्रतिष्ठान स्वतःच्या २१ एकर जागेत आपले बहुउद्देशीय कार्य विस्तारित आहे. त्या त्या भागातील सर्वच राजकीय नेते व कार्यकर्ते तसेच प्रशासन आपापल्या पद्धतीने विकास कार्य करीत असते.

त्याच कार्याला पूरक आणि मदतीचे ठरणारे काम तालुक्यात जन्म घेतलेल्या अधिकाऱ्यांचे संघटित स्वयंसेवी काम तालुक्याच्या फायद्याचे ठरते.”ज्ञानसेतू प्रतिष्ठान” चा हा उपक्रम राज्यात विविध भागात जन्मलेल्या व आपल्या जबाबदारीच्या निमित्ताने देशभर विखुरलेल्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्र अधिकाऱ्यांना निश्चित प्रेरणा देईल व महाराष्ट्रात ही चळवळ अधिक गतिमान होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button