मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला बलात्कार प्रकरणात अटकेत
नितीन शुक्ला विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला बलात्कार प्रकरणात अटकेत

मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांना पार्कसाईट पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका 32 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या तीन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर विवाहास नकार दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन शुक्ला यांना मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी नितीन शुक्ला हे मनपाच्या इमारत दुरुस्ती विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना विक्रोळी परिसरात त्यांची पीडितेशी ओळख झाली. हळूहळू ही ओळख मैत्रीत बदलली. याच काळात त्यांनी लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
पीडितेने विवाहासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतर शुक्ला यांनी टाळाटाळ सुरू केल्याचे सांगितले जाते. अखेर रविवारी संध्याकाळी पीडितेने पार्कसाईट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



