आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईवर्सोवा विधानसभाविशेषसामाजिक

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अंधेरी पश्चिम लिंक रोड येथील चित्रकूट ग्राउंड येथील अग्निशमन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होणार!

 नगरसेवक रूपेश सावरकर यांचा सकारात्मक पुढाकार; ९० दिवसांत जमीन हस्तांतरण आणि बांधकाम निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अंधेरी पश्चिम लिंक रोड येथील चित्रकूट ग्राउंड येथील अग्निशमन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होणार!

 

नगरसेवक रूपेश सावरकर यांचा सकारात्मक पुढाकार; ९० दिवसांत जमीन हस्तांतरण आणि बांधकाम निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी

मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अंधेरी पश्चिम लिंक रोड येथील चित्रकूट ग्राउंड येथे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अग्निशमन केंद्राच्या उभारणीसाठी भाजपचे नगरसेवक रूपेश सावरकर यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अश्विनी भिडे यांची भेट घेऊन जमीन हस्तांतरण आणि बांधकाम निविदा प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याची मागणी केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अग्निशमन केंद्राच्या उभारणीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अंधेरी पश्चिम लिंक रोड येथील चित्रकूट ग्राउंड अग्निशमन केंद्राची आवश्यकता अनेक वर्षांपासून जाणवत आहे. विशेष म्हणजे, या अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेला भूखंड १९९१ पासून नियोजित असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. मात्र, विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे हा प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात साकार होऊ शकलेला नाही. आता या विषयाचा पाठपुरावा करत नगरसेवक रूपेश सावरकर यांनी प्रशासनाकडे ठोस कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी केली आहे.

 

नगरसेवक सावरकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना दिलेल्या पत्रात महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिली आहे. १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत खासगी भूखंडमालकांनी अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक असलेला भूखंड हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवून तो महापालिकेकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत प्रशासकीय पत्रव्यवहार आणि पुढील प्रक्रिया अद्याप पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरणाची अधिकृत प्रक्रिया तातडीने पूर्ण करून बांधकाम निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे.

 

दिवाळीत लोखंडवाला येथील आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन केंद्राची गरज अधोरेखित

 

७ नोव्हेंबर रोजी लोखंडवाला येथील रूनवाल एलिगंटे इमारतीत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेने परिसरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला. या दुर्घटनेत ४६ वर्षीय लिफ्ट ऑपरेटर धनपत महातू यांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळेत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उपलब्ध असल्यास आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याचा कालावधी आणखी कमी होण्यास मदत होऊ शकते, अशी भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

 

अनधिकृत बांधकामांवर कारवाई; अग्निशमन केंद्रासाठी भूखंड मोकळा

 

या भूखंडासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर के-पश्चिम विभागाने सप्टेंबर महिन्यात संबंधित जागेवरील अनधिकृत गॅरेज आणि विवाह सभागृहावर तोडक कारवाई केली होती. अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अनधिकृत वापर हटविण्याच्या या कारवाईनंतर आता प्रत्यक्ष अग्निशमन केंद्र उभारण्याच्या दिशेने प्रशासनाने पुढील पावले उचलणे आवश्यक आहे.

 

९० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी सावरकरांचा आग्रह

 

केवळ आश्वासने न देता जमीन हस्तांतरण, प्रशासकीय मंजुरी आणि बांधकाम निविदा या महत्त्वाच्या टप्प्यांना निश्चित कालमर्यादा असावी, अशी भूमिका नगरसेवक रूपेश सावरकर यांनी घेतली आहे. येत्या ९० दिवसांत या प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात अग्निसुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांच्या जीविताशी निगडित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे लोखंडवाला परिसरात अग्निशमन केंद्र उभारल्यास केवळ एका विभागालाच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मोठा दिलासा मिळू शकतो.

 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी नगरसेवक रूपेश सावरकर यांनी केलेला पाठपुरावा आणि ९० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. आता मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि संबंधित प्रशासन या मागणीला किती वेगाने प्रतिसाद देते, याकडे लोखंडवाला परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लोखंडवाला अग्निशमन केंद्राचा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा, हीच परिसरातील रहिवाशांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button