अंधेरी पश्चिम चित्रकूट मैदानावरील अग्निशमन केंद्रासाठी हालचालींना वेग चित्रकूट मैदानावर अग्निशमन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा?
नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्री आशिष शेलार यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

अंधेरी पश्चिम चित्रकूट मैदानावरील अग्निशमन केंद्रासाठी हालचालींना वेग चित्रकूट मैदानावर अग्निशमन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा?
नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्री आशिष शेलार यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरील चित्रकूट मैदान परिसरात प्रस्तावित अग्निशमन केंद्र उभारणीसाठी महत्त्वाच्या हालचालींना वेग आला आहे. वार्ड क्रमांक ६३ चे नगरसेवक रुपेश गजानन सावकर यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे निवेदन सादर केले होते. त्याची गंभीर दखल घेत पालकमंत्री शेलार यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती.

नगरसेवक रुपेश सावरकर यांनी आपल्या निवेदनात चित्रकूट मैदान परिसरातील अग्निशमन केंद्रासाठी राखीव जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण आणि अनधिकृत वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या जागेवर तातडीने अतिक्रमण हटवून नियोजित अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ११ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, एसआरए अधिकारी, अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन केंद्राची गरज अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. परिसरात वाढती लोकसंख्या, उंच इमारती आणि वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे केंद्र जवळ असणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून लवकरच या जागेवरील अतिक्रमण हटवून अग्निशमन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.


