आमची मुंबईगुन्हेगुन्हेमहाराष्ट्रमुंबईमुंबई चे रस्तेविशेषसामाजिक

लालबाग अपघात प्रकरणात चिमुकल्या अथांगचा मृत्यू; कुटुंबाला मदत कधी? मंत्री प्रताप सरनाईक भेट घेणार का?

अथांग (वय ४) या निरागस बालकाचा २० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

लालबाग अपघात प्रकरणात चिमुकल्या अथांगचा मृत्यू; कुटुंबाला मदत कधी? मंत्री प्रताप सरनाईक भेट घेणार का?

 

मुंबईतील लालबाग परिसरात बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या भीषण अपघाताने अखेर एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतला आहे. अथांग (वय ४) या निरागस बालकाचा २० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथांग हा आपल्या वडील मंदार तावडे यांच्यासोबत दुचाकीवरून शाळेतून घरी परतत होता. परळ ब्रिज उतरून सेंट्रल रेल्वे वर्कशॉपजवळील सिग्नलवर ते थांबले असताना, सिग्नल सुटण्यास अवघे १० ते १५ सेकंद बाकी असताना मागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

सदर शिवशाही बस क्रमांक MH09 EM 8639 असून चालकाचे नाव शामराव नाथराव नगरगोजे असे असल्याचे समोर आले आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने निष्काळजीपणे बस चालवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

 

अपघातात अथांगला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर रुग्णालयातील पीआयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान २० फेब्रुवारी रोजी त्याची प्राणज्योत मालवली. वडील मंदार तावडे हे देखील या अपघातात जखमी झाले असून ते अद्याप वैद्यकीय उपचार आणि फिजिओथेरपी घेत आहेत.

 

दरम्यान, अपघातानंतर संबंधित बसचालकाला अटक करण्यात आली होती. मात्र त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, अद्याप बेस्ट प्रशासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा सहानुभूतीपर प्रतिसाद देण्यात आलेला नाही. एका निष्पाप बालकाचा बळी गेला, तरी संबंधित यंत्रणा संवेदनशीलता दाखवताना दिसत नाहीत, अशी टीका केली जात आहे.

 

या पार्श्वभूमीवर राज्याचे संबंधित मंत्री प्रताप सरनाईक यांनी या दुःखी कुटुंबाची भेट घ्यावी आणि योग्य ती मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अथांगच्या निधनाने तावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निष्पाप जीवाच्या जाण्याने केवळ एक कुटुंब नव्हे, तर संपूर्ण समाज व्यथित झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि कुटुंबाला न्याय मिळावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button