लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ साठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची नामांकनात निवड
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना ‘उत्कृष्ट संसदसदस्य पुरस्कार’ तसेच ‘आदर्श आमदार पुरस्कार’ ने सन्मानित

लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ साठी अमित साटम यांची नामांकनात निवड

मुंबई : राज्याच्या राजकीय क्षेत्रात प्रभावी कामगिरी बजावणारे भाजपचे आमदार अमीत साटम यांची यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. ‘राजकारण (प्रॉमिसिंग)’ या गटात त्यांची निवड झाली असून त्यांच्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

भाजपचे तरुण, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले अमित साटम यांची २५ ऑगस्ट २०२५ रोजी भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाली. व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिले असून मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र व समाजशास्त्र पदवी तसेच एमडीएस इन्स्टिट्यूटमधून एमएमएस (एचआर) पदवी त्यांनी संपादन केली आहे.
२०१२ ते २०१७ दरम्यान मुंबई महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०१४ पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
मुंबईतील पायाभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिकेसाठी त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली. १८८ तासांच्या उपोषणानंतर मुंबईत एलईडी रस्ते दिवे बसविण्याचा निर्णय झाला, तसेच पालिकेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना ‘उत्कृष्ट संसदसदस्य पुरस्कार’ तसेच ‘आदर्श आमदार पुरस्कार’ मिळाला आहे. विकासाभिमुख, पारदर्शक आणि सक्षम मुंबई घडविण्याच्या ध्येयाने ते सातत्याने कार्यरत आहेत.

दरम्यान, ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी वाचकांनी लोकमतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




