*अंधेरी पश्चिममध्ये नालेसफाईच्या कामांचा फज्जा; शिवसेनेकडून प्रत्यक्ष पाहणी, प्रशासनावर टीका**
विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया यांनी इर्ला नाला, रसराज नाला तसेच प्रभाग क्र. ६६ मधील जुहू गल्ली व धनगरवाडी परिसरातील नालेसफाई व गटार स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

**अंधेरी पश्चिममध्ये नालेसफाईच्या कामांचा फज्जा; शिवसेनेकडून प्रत्यक्ष पाहणी, प्रशासनावर टीका**

मुंबई : पावसाळा तोंडावर आलेला असताना अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नालेसफाईच्या कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेना नेते व विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया यांनी इर्ला नाला, रसराज नाला तसेच प्रभाग क्र. ६६ मधील जुहू गल्ली व धनगरवाडी परिसरातील नालेसफाई व गटार स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याचे तसेच कचऱ्याचे ढिगारे व तरंगणारा कचरा आढळून आला. नालेसफाईची कामे केवळ कागदोपत्री आणि दिखाव्यापुरती सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष सोशल मीडियावरील प्रसिद्धीमध्ये व्यस्त असून प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची प्रभावी स्वच्छता झाली नाही, तर जेव्हीपीडी, मिठीबाई आणि नेहरूनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच जुहू गल्ली व धनगरवाडी परिसरातील पाहणीत अनेक गटारे तुंबलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः झोपडपट्टी भागातील अंतर्गत परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगण्यात आले.

पालिका प्रशासनाने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेऊन तुंबलेली गटारे आणि नाले पूर्णपणे स्वच्छ करावेत, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने आणि तत्परतेने काम करण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले. या पाहणीवेळी शाखाप्रमुख श्री संजय जाधव, शाखाप्रमुख श्री उदय महाले, उपशाखाप्रमुख श्री रोहित मोहिते, श्री इराण्णा पुजारी, श्री जमील इद्रिसी, श्री निंगप्पा धनगर, महिला उपशाखा संघटक सौ. पल्लवी डोळे, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



