जुहू समुद्रकिनाऱ्यावर १० दिवसांत ९ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटवला; महापालिकेची युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम
"जुहू समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेची अमित साटम यांच्याकडून पाहणी; प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड व महापालिका अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा"

जुहू समुद्रकिनाऱ्यावर १० दिवसांत ९ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटवला; महापालिकेची युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम
मुंबई | प्रतिनिधी

मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्रात वाहून गेलेला प्रचंड कचरा भरतीच्या लाटांसह पुन्हा किनाऱ्यावर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जुहू समुद्रकिनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, अवघ्या दहा दिवसांत तब्बल ९ हजार ८०० मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन, डंपर, ट्रॅक्टर आणि इतर आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही मोहीम युद्धपातळीवर राबवली आहे. दररोज सुमारे ९८० मेट्रिक टन कचरा समुद्रकिनाऱ्यावरून हटवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

भरतीच्या लाटांमुळे कचऱ्याचा ओघ कायम
जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाले, गटारे आणि जलवाहिन्यांमधील प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड, झाडांच्या फांद्या, घरगुती कचरा आणि इतर घनकचरा समुद्रात वाहून गेला होता. मात्र, भरतीच्या लाटांमुळे हा सर्व कचरा पुन्हा मोठ्या प्रमाणात जुहू किनाऱ्यावर जमा होत आहे. सध्या देखील दररोज सुमारे ३५० मेट्रिक टन कचरा समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत असल्याने स्वच्छता मोहीम सातत्याने सुरू ठेवावी लागत आहे.

किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न
जुहू समुद्रकिनारा हा मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दररोज हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची येथे गर्दी असते. त्यामुळे किनारा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आणि समुद्री जैवविविधतेचे संवर्धन हे देखील या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा
जुहू किनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीनंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहिमेला अधिक गती दिली असून, अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. आमदार अमीत साटम व के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड
नागरिकांनाही आवाहन
महापालिकेने नागरिकांना प्लास्टिक, थर्माकोल, पूजेचे साहित्य आणि इतर कचरा नाले, समुद्र किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात नाल्यांमधून वाहून जाणारा कचरा अखेरीस समुद्रकिनाऱ्यावर येत असल्याने पर्यावरणासह सागरी जीवसृष्टीवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी दीर्घकालीन उपायांची गरज
तज्ज्ञांच्या मते, केवळ समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहीम पुरेशी नाही. नाल्यांवर ट्रॅश बूम, कचरा अडविणारी यंत्रणा, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि नागरिकांमध्ये जनजागृती या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास समुद्रात जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
महापालिकेची स्वच्छता मोहीम सुरू असली तरी मुंबईकरांनीही जबाबदारीने कचरा व्यवस्थापन केल्यासच जुहूसह मुंबईतील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवणे शक्य होईल.


