वॉर्ड क्र. 63 मधील चित्रकूट ग्राउंड येथील बेकायदा जाहिरात फलक प्रकरणात FIR; भाजपा युवा नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवर आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; बेकायदा जाहिरात फलक उभारणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

वॉर्ड क्र. 63 मधील चित्रकूट ग्राउंड येथील बेकायदा जाहिरात फलक प्रकरणात FIR; भाजपा युवा नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवर आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; बेकायदा जाहिरात फलक उभारणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

(Maharashtra News 9 टीम) मुंबई | प्रतिनिधी
अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 63 मध्ये बेकायदा जाहिरात फलकांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे भाजपा युवा नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे. न्यू लिंक रोड परिसरातील शाह कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जागेवर परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून जाहिरात फलक उभारल्याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे.
महापालिकेच्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित जाहिरात फलकाबाबत यापूर्वीही नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु नियमांचे पालन न करता परवानगीच्या अटींचा भंग झाल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अंधेरी पोलिसांकडून सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
भाजपा युवा नगरसेवक रुपेश सावरकर यांनी वॉर्ड क्रमांक 63 मधील बेकायदा जाहिरात फलक, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि महापालिकेच्या महसुलाचे होणारे नुकसान याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
रुपेश सावरकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वॉर्ड क्रमांक 63 मध्ये कोणत्याही प्रकारचा बेकायदा कारभार खपवून घेतला जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी माझा पाठपुरावा पुढेही सुरू राहील.”
या कारवाईमुळे बेकायदा जाहिरात फलक उभारणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा प्रकरणांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



