आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

चुकीच्या दिशेने भरधाव स्कूटर;  ८ वर्षीय चिमुकली रेवा पवार गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार

आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गाडी नंबर नसल्यामुळे आंबोली पोलीसना आरोपी शोधायचे मोठे चॅलेंज

चुकीच्या दिशेने भरधाव स्कूटर;  ८ वर्षीय चिमुकली रेवा पवार गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार

 

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन पुन्हा एकदा एका निष्पाप चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. चुकीच्या दिशेने (Wrong Side) भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरने धडक दिल्याने ८ वर्षीय रेवा पवार ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रेवा पवार ही आपल्या आईसोबत शिकवणीला जात असताना रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी चुकीच्या दिशेने वेगात येणाऱ्या स्कूटरने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे रेवा गंभीर जखमी झाली. तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिला उलट्याही झाल्या. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत तिला रुग्णालयात दाखल केले.

 

प्राथमिक माहितीनुसार, अपघात घडविणाऱ्या स्कूटरवर दोन युवक स्वार होते. अपघातानंतर त्यांनी थांबून मदत करण्याऐवजी तेथून पळ काढल्याचा आरोप आहे. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून त्यांच्या ओळखीबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या घटनेनंतर मुंबईतील वाहतूक शिस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः राँग साईडने वाहन चालविणे, अतिवेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

 

नागरिकांनी अशा बेदरकार वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी राँग साईड वाहनचालकांवर विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button