मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड यांनी केला अंधेरी पश्चिम विधानसभा व वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचा पाहणी दौरा
मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे. विशेषतः सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडूनही अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात- रोहन राठोड

मुंबई : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड यांनी केला अंधेरी पश्चिम विधानसभा व वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचा पाहणी दौरा

मुंबईत सलग तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम प्रभाग समितीचे अध्यक्ष रोहन राठोड यांनी अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील विविध भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

या दौऱ्यादरम्यान वॉर्ड क्रमांक ५९, ६८, ६० आणि ६३ मधील रस्ते, पाणी साचणारी ठिकाणे, नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत वॉर्ड क्रमांक ६० च्या भाजप नगरसेविका सायली कुलकर्णी, वॉर्ड ६३ चे भाजप नगरसेवक रुपेश सावरकर हेही उपस्थित होते. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
रोहन राठोड यांनी सांगितले की, सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असूनही मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे. विशेषतः अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.

यावेळी त्यांनी जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यावर भर देत पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही रोहन राठोड यांनी केले.

पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि सर्व आवश्यक सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिका पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



