भायंदरच्या बांधकामस्थळी तरुण कामगाराचा बळी; प्रशासनाचा दणका!
२४ वर्षीय कामगाराच्या विजेच्या धक्क्याने मृत्यूनंतर FIR दाखल; कामगार आयुक्तांचा ‘काम बंद’ आदेश, नगररचना विभागाची कारणे दाखवा नोटीस
भायंदरच्या बांधकामस्थळी तरुण कामगाराचा बळी; प्रशासनाचा दणका!
२४ वर्षीय कामगाराच्या विजेच्या धक्क्याने मृत्यूनंतर FIR दाखल; कामगार आयुक्तांचा ‘काम बंद’ आदेश, नगररचना विभागाची कारणे दाखवा नोटीस
मीरा-भाईंदर | विशेष प्रतिनिधी
भायंदर पूर्व येथील शीतल धारा बिल्डिंगच्या बांधकामस्थळी २३ ऑगस्ट २०२६ रोजी २४ वर्षीय बांधकाम कामगार वेंकटप्पा राम चिन्मुल्लम याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0471/2026 दाखल करण्यात आला असून, त्यानंतर कामगार विभागाने घटनास्थळी पाहणी करून संबंधित बांधकामाचे काम बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. त्याचबरोबर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित विकासकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तक्रारीनंतर पोलिसांत FIR दाखल झाला आहे उपलब्ध गुन्हानुसार, घटना २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.४५ ते ४.१५ या कालावधीत घडली. याबाबत पोलिसांना २७ ऑगस्ट रोजी मुतुला याचें पत्र मिळाल्यानंतर मीरा रोड पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0471/2026 नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम 106(1) व 3(5) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, आरोपी म्हणून लक्ष्मी ग्रुपचे संचालक विकास रवीलाल पटेल आणि हनुमंत चिन्मय्या गोल्ला यांची नावे नमूद आहेत.

कामबंद आदेश – दुर्घटनेनंतर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या ठाणे कार्यालयाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. निरीक्षणादरम्यान बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक उपाययोजनांबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षा जाळी, सुरक्षा पट्टा, विद्युत धोक्यांपासून संरक्षण, हेल्मेट व इतर आवश्यक सुरक्षा साधने तसेच सुरक्षित कार्यपद्धती याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात आली नसल्याचे निरीक्षण आदेशात नोंदविण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधित बांधकामाचे काम सुरक्षाविषयक आवश्यक उपाययोजना पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
नगररचना विभागाचीही कारवाई; विकासकाला ‘शो-कॉज’
या प्रकरणात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी स्वतंत्र नोटीस बजावली आहे.

महापालिकेच्या पत्रानुसार, मौजे भाईंदर येथील संबंधित भूखंडावरील बांधकामाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. तसेच प्रकरणाबाबत आवश्यक खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या पत्रात २३ ऑगस्ट रोजी बांधकामस्थळी विद्युत शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
‘Unnatural Death’पुरते प्रकरण मर्यादित राहू नये
या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अॅड. भिमेश मुतुला, सचिव, महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगार संघटना तथा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती, आयुष्मान भारत PM-JAY व MJPJAY यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
अॅड. मुतुला म्हणाले,
> “२४ वर्षीय तरुण कामगाराचा बांधकामस्थळी मृत्यू ही अत्यंत गंभीर घटना आहे. हे प्रकरण केवळ ‘Unnatural Death’ म्हणून कागदोपत्री मर्यादित राहू नये, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर FIR दाखल झाला असून कामगार आयुक्त कार्यालयाने प्रत्यक्ष पाहणी करून काम बंद करण्याचा आदेश दिला आहे. मात्र नगररचना विभागानेही फक्त कारणे दाखवा नोटीस देत या गुन्ह्यात सहभागी दाखविले आहेत . आता या दुर्घटनेमागील नेमकी कारणे, सुरक्षा नियमांचे पालन झाले नाहीत आणि जबाबदारी कोणाची आहे, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.”
मृत कामगाराच्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा या प्रकरणात मृत कामगाराची रोजगारस्थिती, त्याची नियुक्ती कोणत्या कंत्राटदारामार्फत झाली होती, बांधकामस्थळी विद्युत सुरक्षा व्यवस्था, आवश्यक सुरक्षा साधने, कामगारांच्या सुरक्षा नोंदी, वैधानिक परवानग्या तसेच मृताच्या कुटुंबाला लागू असलेली कायदेशीर नुकसानभरपाई व इतर हक्क यांची तपासणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गुन्हा नोंद, कामगार आयुक्तांचा काम बंद आदेश आणि महापालिकेच्या नगररचना विभागाची कारणे दाखवा नोटीस यामुळे प्रकरणात प्रशासनिक व कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे. आता पुढील तपासात दुर्घटनेची नेमकी कारणे व जबाबदारी निश्चित होऊन कायदेशीर प्रक्रिया कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



