भिवंडीत मोठी कारवाई! सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत
सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची केली होती मागणी रकमेतील पहिला हप्ता २ लाख ५० हजार घेताना रंगेहाथ अटक

भिवंडीत मोठी कारवाई! सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

भिवंडी -भिवंडी महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये आणखी एका मोठ्या कारवाईची भर पडली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) प्रभाग समिती क्रमांक ३ चे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर (वय ५२) यांना अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या कारवाईमुळे भिवंडी महानगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग समिती क्रमांक ३ च्या हद्दीत सुरू असलेल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २ लाख ५० हजार रुपये तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून लाच मागितल्याची खातरजमा झाल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास प्रभाग समिती कार्यालयाबाहेरील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या स्वतःच्या कारमध्ये सुरेंद्र भोईर यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच ACB पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
कारवाईनंतर सुरेंद्र भोईर यांना शहर पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली.
या घटनेमुळे भिवंडी महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांत पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चार कारवायांमध्ये सात कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र अशा कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई होत नसल्याची आणि त्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती दिली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
#Bhiwandi #SurendraBhoir #ACB #BriberyCase #BhiwandiMunicipalCorporation #BreakingNews #MaharashtraNews9 #Corruption #ThaneACB #MaharashtraNews


