निर्माल्य कलश आणि दळवी पॅटर्नचे जनक सुभाष दळवी यांच्याकडे राज्याच्या स्वच्छ अभियानाची जबाबदारी
राज्यातील सर्व शहरांमध्ये स्वच्छतेचे नवनवीन पॅटर्न राबविण्याचा दळवी यांचा निर्धार

निर्माल्य कलश आणि दळवी पॅटर्नचे जनक सुभाष दळवी यांच्याकडे राज्याच्या स्वच्छ अभियानाची जबाबदारी
राज्यातील सर्व शहरांमध्ये स्वच्छतेचे नवनवीन पॅटर्न राबविण्याचा दळवी यांचा निर्धार
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून सुभाष दळवी यांची नियुक्ती
आज देशभरातील विविध धार्मिक स्थळी दिसून येणाऱ्या निर्माल्य कलशांचे जनकत्व ज्यांच्याकडे जाते, कचरा व्यवस्थापनाच्या ‘दळवी पॅटर्न’चे ही जे संकल्पक आहेत आणि धारावीसारख्या आव्हानात्मक परिसरात ज्यांनी स्वच्छता अभियान शक्य करून दाखवले; ते स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी श्री. सुभाष दळवी यांची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
..

महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल श्री. दळवी यांनी सर्व संबंधित वरिष्ठांचे आभार मानतानाच, त्यांच्यावर विश्वास टाकल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आजवर ज्यांनी – ज्यांनी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेले स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम या कामांना हातभार लावलेला आहे; त्या सर्वांप्रतीही श्री. दळवी यांनी आवर्जून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

..
लोकसहभागातून ‘धारावी स्वच्छतेचे मॉडेल’ आज़ सर्वांनाच परिचित आहे. त्याचबरोबर जलप्रदूषण रोखण्यासाठीचे निर्माल्य कलश, निर्माल्य व्यवस्थापन, होम कंपोस्ट, कचरा वर्गीकरण, वस्ती पातळीवर कचरा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑरगॅनिक फार्मिंग’, प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधातील अभियान, मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी दत्तक वस्ती योजना यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजनांची संकल्पना श्री. दळवी यांनीच मांडली होती. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून या संकल्पना प्रत्यक्षात आल्या होत्या. मुंबई स्वच्छ आणि रहावी, यासाठी अविश्रांत मेहनत घेताना श्री दळवी यांना अनेकांनी बघितले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्रकिनारे, झोपडपट्ट्या आणि रेल्वे ट्रॅक जवळचा परिसर या ठिकाणी पहाटे ४ पासून त्यांची चीरपरिचित शिट्टी घेऊन लोकांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यास प्रेरित करणारे श्री. दळवी अनेकांनी अनुभवले आहेत. त्यामुळेच दळवी यांच्याकडे देण्यात आलेली राज्याची सूत्रे, ही बाब अनपेक्षित नसली तरी अभिनंदनीय निश्चितच आहे.
..
स्वच्छता व पर्यावरण संतुलनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे श्री. दळवी हे मानकरी ठरले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने देखील त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर यासारख्या सन्माननीय पदव्यांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. श्री. दळवी यांचे हे योगदान लक्षात घेऊनच त्यांची स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माहिती, शिक्षण, प्रचार व प्रसिद्धी तसेच क्षमता बांधणीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता व अंमलबजावणी करिता श्री. दळवी यांची या प्रकल्पाच्या राज्य समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
..



