अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार लटके हे सहपरिवार दुबईला होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लटके यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे. रमेश लटके यांच्याबाबत थोडक्यात रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
शिवसेनेचे गटप्रमुख ते अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. रमेश लटके यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी १९९७ ते २०१२ अशा सलग ३ वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असताना देखील रमेश लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या सुरेश शेट्टींना मतदारांनी १९९९ ते २००९ अशा सलग ३ वेळा निवडून दिले होते. त्यामुळे सुरेश शेट्टींचा दबदबा होता. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी ही तिहेरी लढत होती. भाजपकडून सुनील यादव मैदानात होते. तर काँग्रेसकडून सुरेश शेट्टी. मात्र जनतेने लटकेंना कौल दिला. लटकेंनी भाजपच्या सुनील यादव यांचा ५ हजार ४७९ मतांनी पराभव केला. तर काँग्रेसची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. यानंतर २०१९ च्या लढतीत लटके यांनी अपक्ष मुरजी पटेल यांचा १६ हजार ९६५ इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.



