वॉर्ड ७१ मध्ये भाजपचा झेंडा पुन्हा फडकला; सुनिता राजेश मेहता ४,३१० मतांनी विजयी
आमदार अमीत साटम– पराग अळवणींच्या ११ वर्षांच्या कामाला मतदारांची पसंती; वॉर्ड ७१ भाजपकडे

मुंबई :मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ७१ मधून भाजपच्या उमेदवार सुनिता राजेश मेहता यांनी ९८२५ मते मिळवत ४,३१० मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे परिसरात भाजपचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सुनिता राजेश मेहता यांनी वॉर्ड क्रमांक ७० मधून तब्बल ९,२०० मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. सातत्याने मिळालेल्या जनसमर्थनामुळे त्यांची लोकप्रियता कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या निवडणुकीत मिळालेल्या विजयामागे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम व विलेपार्ले विधानसभा आमदार पराग अळवणी यांच्या गेल्या ११ वर्षांच्या विकासकामांचा मोठा वाटा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर झालेल्या कामांचा थेट फायदा भाजप उमेदवाराला झाल्याचे स्पष्ट होते.

या निकालानंतर वॉर्ड ७१ मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा विजय विकासावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.



