आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

मालाड गृहनिर्माण घोटाळा: MPID कायद्यांतर्गत मालमत्ता जप्तीचे आदेश; पीडित महिलांच्या आशा पल्लवित, ॲड. सुभाष पगारे आणि अमोल भालेराव यांचे मानले आभार

अविनाश देवराम भानजी व प्रमोद देवराम भानजी यांच्याविरोधात MPID (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण) कायद्यांतर्गत अखेर मालमत्ता जप्तीचे शासन आदेश झाले निर्गमित

मालाड गृहनिर्माण घोटाळा: MPID कायद्यांतर्गत मालमत्ता जप्तीचे आदेश; पीडित महिलांच्या आशा पल्लवित, ॲड. सुभाष पगारे आणि अमोल भालेराव यांचे मानले आभार

मुंबई:

मालाड पश्चिम येथील मढ आयलंड परिसर, शिवाजी नगर येथे कमी दरात घरे देण्याचे आमिष दाखवून सुमारे ६० महिलांची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी अविनाश देवराम भानजी आणि त्याचा भाऊ प्रमोद देवराम भानजी यांच्याविरोधात MPID (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण) कायद्यांतर्गत अखेर मालमत्ता जप्तीचे शासन आदेश निर्गमित झाले आहेत. या कारवाईमुळे कष्टकरी महिलांना आपले हक्काचे पैसे परत मिळण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी अविनाश भानजी आणि प्रमोद भानजी यांनी स्वतःला विकासक (डेव्हलपर) असल्याचे सांगून मढ आयलंड येथे १०० हून अधिक घरे विकसित करत असल्याचे भासवले. प्रत्येक महिलेकडून सुमारे ४ लाख रुपये गुंतवणूक म्हणून घेण्यात आले. मात्र, दोन वर्षे उलटूनही बांधकामात कोणतीही प्रगती झाली नाही आणि पैसे किंवा घरे परत देण्यास आरोपींनी नकार दिला. सर्व पीडित महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील आहेत.

लोकप्रतिनिधी व समाजसेवकांचा पुढाकार:

या गंभीर फसवणुकीची दखल घेत स्थानिक आमदार असलम शेख यांनी संबंधित पोलीस उपाध्यक्षांना (DCP) या प्रकरणात सविस्तर व निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश दिले होते. तसेच समाजसेवक संजय सुतार यांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी सातत्याने पाठपुरावा करून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

कायदेशीर लढा आणि शासकीय राजपत्र:

न्यायालयात पीडित महिलांच्या बाजूने वकील ॲड. नेहा एम. पाटील, ॲड. गणेश चव्हाण आणि ॲड. सुभाष पगारे यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींवर MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार व पोलीस तपासाच्या आधारे गृह विभागाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश जारी करून अविनाश देवराम भानजी यांच्या अंधेरी वर्सोवा येथील स्थावर मालमत्ता आणि विविध बँकांमधील खाती जप्त (Attach) करण्याचे आदेश दिले आहेत. २ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासकीय राजपत्र (Gazette) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पीडित महिलांनी व्यक्त केले आभार:

शासकीय आदेश आणि मालमत्ता जप्तीच्या प्रक्रियेमुळे फसवणूक झालेल्या सर्व पीडित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच आपले कष्टाचे पैसे परत मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्वी कायदेशीर लढ्याबद्दल सर्व पीडित महिलांनी ॲड. सुभाष पगारे आणि जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव ,अँड विक्रम कपूर यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button