पत्रकार विलास बडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले खुले पत्र

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदेंना खुलं पत्र
मा. मुख्यमंत्री साहेब
नमस्कार,
एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहितोय. आपण अतिशय वेगाने निर्णय घेताय. सामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून संवेदनशीलपणे काम करताय त्याबद्दल कौतुक आहे. पण काही गोष्टीतलं आपलं दुर्लक्ष भविष्यातल्या संकटाचं कारण ठरू शकतं म्हणून हा पत्रप्रपंच.
फेब्रुवारीची आज १६ तारीख आहे. कुठल्याही नोकरदारासाठी पगाराचा उलटलेला एक एक दिवस अतिशय कठीण असतो. कारण दारावर देणेकरी असतो. हप्ता चुकला तर ईएमआयवाले जीव जाईपर्यंत छळतात. घराचा प्रपंच चालवणं अवघड होतं. दवाखाना, मुलांचं शिक्षण हे वेगळंच. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात आज यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. हजारो कर्मचारी बॅंकेचा मेसेज आणि टीव्हीकडे डोळे लावून बसलेत. आपला पगार कधी होणार या आशेवर.
राज्यात एसटीचं ऐतिहासिक आंदोलन झालं. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संप चिघळत गेला. पाच महिने मुख्यमंत्री चकार शब्द बोलले नाहीत. चुकीच्या लोकांनी त्या धगीवर आपापल्या भाकरी शेकून घेतल्या. एसटी आणि कर्मचारी मात्र देशोधडीला लागले. पण त्याला न्याय मिळाला नाही. सत्ताबदल झाल्यावर आपलं जगणं बदलेल या आशेवर काबाडकष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली.
राज्यातल्या ७५ वर्षापुढच्या नागरीकांना मोफत प्रवासाची योजना आपण आणली. कोट्यवधी लोक एसटीने प्रवास करत आहेत. तुम्हाला आशीर्वाद देणारे हे लोक मतही देतील पण एसटीच्या अर्थकारणाला जो ब्रेक लागला त्याचं काय? एसटीचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी किती प्रयत्न झाले? भंगार गाड्या रस्त्यावर फिरत आहेत. अनेक अपघात होत आहेत. लोकांचे हाकनाक जीव जात आहेत हे कोण रोखणार?

उच्च न्यायालयात मागच्या सरकारने पगाराची हमी घेतली पण गेल्या चार महिन्यापासून सरकारचे पैसे वेळेत मिळत नाहीत. अर्थविभाग आणि आपलं एसटी महामंडळ यांच्यात लालफितीचा कारभार सुरु आहे. परिणामी पगार वेळेवर होत नाहीत. या उसनवारीच्या आॅक्सिजनवर एसटीला तुम्ही किती दिवस जगवणार आहात?
लोकप्रिय घोषणांचा धडाका लावून टाळ्या आणि कदाचित मतंही मिळतील. पण एसटीच्या रूतलेल्या चाकाचं काय? एसटीला कॅन्सर झालाय. आता पेनकिलरची नाही, आॅपरेशनची गरज आहे.
तोट्यातली एसटी फायद्यात आणण्यासाठी दूरदृष्टीच्या धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. एका प्रचंड अस्वस्थतेनं राज्यात एसटीच्या ऐतिहासिक आंदोलनानं जन्म घेतला. काही हौशागौशांनी त्याचा फायदा घेतला. वाटोळं झालं ते फक्त एसटीचं आणि तिच्या सेवेकऱ्याचं. आज पुन्हा कर्मचाऱ्यांच्या मनात अस्वस्थता दाटू लागलीय. सांगलीत एक आत्महत्या झालीय. वेळेआधीच आपण त्याची दखल घ्यावी. ज्यांना आजवर सगळ्यांनी गंडवलं त्या अनाथ कष्टकऱ्यांचे नाथ व्हावं ही विनंती.
आपला
विलास बडे



