आमची मुंबईमहाराष्ट्रविशेषसामाजिक

लेखिका डॉ. अंजुषा पाटील यांनी दैनंदिन जीवनात आलेले अनुभव, ओळखीची व अनोळखी भेटलेली माणसे यांचा पुस्तक रुपी अनुभव म्हणजेच ” सामर्थ्य शब्दांचे “

 " सामर्थ्य शब्दांचे " हा लेखिका डॉ. अंजुषा पाटील यांचा स्फूटलेखसंग्रह पाहता क्षणी आवडला - डॉ सुचिता पाटील

डॉ सुचिता पाटील यांनी डॉ. अंजुषा पाटील यांचा स्फूटलेखसंग्रह केलेले पुस्तक परिक्षण ..

” सामर्थ्य शब्दांचे ” हा लेखिका डॉ. अंजुषा पाटील यांचा स्फूटलेखसंग्रह पाहता क्षणी आवडला. मुखपृष्ठ मार्मिक आणि आकर्षक असून वेगवेगळ्या विषयावरचे लेख वाचकांचे प्रबोधन करतात.

दैनंदिन जीवन जगत असताना लेखिकेला आलेले अनुभव, ओळखीची व अनोळखी माणसे भेटली. त्यातील काही व्यक्तिमत्व जळून पाहता आली. त्यांच्या सहवासातील काही गोड क्षण, प्रसंग, घटना पाहून लेखिकेने आपल्या शब्दरूप विचारांना एकत्र गुंफून अनेक लेख लिहिले आहेत. काही लेख व्हाट्सअप वरील अजय शतकोटी समूहावरील विषयावरचे आहेत. तर काही लेख निसर्ग, विशेष दिन, वाचन, शब्द, भाषा अशा विषयावरचे स्पुटलेख आहेत.

 

लेखिका डॉ.अंजुषा पाटील या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असून शिक्षणाविषयी त्यांना जिव्हाळा आहे. वाचनाचा छंद माणसांना वाचण्यापर्यंत गेलेला असल्यामुळे शब्दाशी त्यांचे नाते जुळले आहे. त्यांचा शिक्षकाचा पिंड असल्यामुळे कोणतीही घटना त्या आपल्या लेखणीतून सोप्या भाषेत समजावून सांगतात.

 

सामर्थ्य रुपी शब्दांना विचारांच्या कोंदणात जणू कलात्मकतेने रचले आहेत.

 

हा स्फूटलेखसंग्रह लेखिकेने ” वल्लरी” प्रकाशनाला अर्पण केला आहे. तसेच या पुस्तकाचे ब्लर्ब वल्लरी प्रकाशाचे प्रकाशक श्री व्यंकटेश कल्याणकर यांनी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, ” शब्दांना खरंच सामर्थ्य असतं का ? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला कधी ना कधी पडतो. कारण एखादा शब्द सांत्वन करतो तर कधी प्रेरणा देतो, कधी वेदना उलगडतो तर कधी जीवनाला नवा अर्थ देऊन जातो. शब्द म्हणजे केवळ अक्षरांची मांडणी नसून ते अनुभूतीचे, भावनेचे, विचारांचे दरवाजे आहेत. या पुस्तकात विविध अंगाने शब्दांच्या जगाचा प्रवास आहे. शब्दांच्या माध्यमातून लेखिका नित्य नूतन पणे काहीतरी नवीन शिकत असल्याची जाणीव अधिक प्रगल्भ करून देतात. या पुस्तकातून निखळ वाचनानंद तर मिळतोच सोबत काही सामाजिक समस्यांकडेही नव्याने कृतिशील मंथन करण्याची प्रेरणा मिळते.

 

प्रस्तुत पुस्तक हे शब्द, बाप्पा, भाषा, ललित, पाऊस, मंथन, चिंतन आणि जीवनानुभव अशा नऊ विभागात विभागले आहेत. यातील लेख एखाद्या सहज अनुभवलेल्या विषयावरचे आहेत. ते वाचल्यानंतर त्यातून वाचकाला आयुष्याचा गुण अर्थ शोधायला भाग पाडतात.

 

सामर्थ्य शब्दांचे या पहिल्याच प्रकरणात लेखिका भावगीतातून शब्दांचे महत्त्व सांगतात. ” शब्दा वाचूनी कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ” तसेच शब्दांच्या माध्यमातून केलेला जो संवाद असतो त्या संवादाशी ती व्यक्ती आपल्याला किती प्रतिसाद देते हे लक्षात येते. तसेच शब्द हे आत्मप्रगतीकरण करण्यासाठी जरी असले तरी ते योग्य ठिकाणी वापरले पाहिजे. आनंददायी शब्द या लेखात आवडणाऱ्या इंग्रजी शब्दाचा उल्लेख आहे. बाप्पा ने असं वरदान द्यावं की… या लेखक गणपती बाप्पा ने सर्वांच्या मनात भक्तीभाव जागृत करून विकृतीचे रूपांतर प्रकृतीमध्ये करावे असे म्हटले आहे. उत्सव आणि खर्च तसेच जबाबदारी सण उत्सव काळातील या दोन्ही लेखात भक्ती, शक्ती, संस्कार आणि जबाबदारीचे दर्शन घडते.

माणूस आणि मातृभाषा व मराठी भेटली इंग्रजीला या दोन्ही लेखात भाषेचे महत्त्व पटवून दिले आहे. मातृभाषा माणसाला प्रेमाने जोजवते तर इंग्रजी सर्व जगातील सर्व क्षेत्रातील माहिती देते. सोबतीने माणूस घडतो. सावली या लेखात वेगवेगळ्या प्रकारच्या सावल्या आपल्या जीवनात कसा प्रभाव पडतात ते उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

आग्रह या लेखात चांगल्या गोष्टींचा आग्रह गृहीत धरलेला आहे. गंध… सुगंध या लेखात त्या फुलांच्या गंधकोषी देवाचे अस्तित्व आहे. जो चराचराला व्यापून उरला आहे असा त्याचा अर्थ. बदलता गाव यात परिवर्तन झालेली ठिकाणी आणि प्रेमाची याविषयी वर्णन आले आहे. तर कोसळती धारा यात मनातले पावसाळी सौंदर्य दिसते. खिडकीतला पाऊस मनाला उभारी देतो तर पाऊस आला पाऊस आला यात मानवी मनाच्या भावनांचा आविष्कार व्यक्त केला आहे. पोर डोंगरावर भाळली या लेखात लेखिकेने पोर या शब्दाचा अर्थ समजावून दाखवताना पोर वयातला अवखळपणा मनाला भावतो. मानसिक वय, माणसं अशी का भांडतात ? या दोन्ही लेखात माणसाच्या मनाच्या तरा आणि भाव विश्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत.

विठ्ठल भक्तीचा छंद, चंद्रभागेच्या तीरी या दोन्ही लेखात भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे लेखिकेने आपल्या मनात उठलेले तरंग, अनुभव विश्वाच्या माध्यमातून अनेक लेख लिहिले आहेत. वाचकांना ते नक्की आवडतील. मनाचे चिंतन करताना समर्थांचे विचार सांगून जीवनाच्या प्रभात समयी रामनाम घेऊन नरदेह सार्थक करावा असे सांगितले आहे. लेखिकेनी माणसाची आवड, हव्यास, लेखनाचा ध्यास, नेमकं काय वाचावं ? याविषयी प्रगल्भ मनाने चिंतन करून आपले विचार मांडले आहेत. जागरण या लेखात आपल्या आवडत्या गोष्टीसाठी केलेला जागरण नक्कीच माणसाला आनंद देते याची अनुभूती मिळते. माझे डायट प्रयोग या लेखात मन, शरीर आणि बुद्धी निरोगी राखण्यासाठी नैसर्गिक जीवन पद्धती अवलंबावी असे मनोगत व्यक्त केले आहे. माणूस समाजशील प्राणी आहे. तो एकता जीवन दीर्घकाळ जगू शकत नाही. आरसा नसता तर… या शेवटच्या लेखात आरशाचा उपयोग माणसाला चेहरा पाहण्या पासून अंतराळातील शास्त्रज्ञा नाही आरशाचा कसा उपयोग होतो. याविषयी विवेचन केले आहे.

लेखिकेची ओघवती भाषाशैली, पटवून देण्याचे कौशल्य वाचकाचे लक्ष वेधून घेते. सदर पुस्तकात लेखिकेने आपल्या प्रभावी लेखणीने, प्रगल्भ विचार व्यक्त करत वेगवेगळ्या विषयांवर 31 लेख नऊ विभागात साकारले आहेत.

 

वल्लरी प्रकाशन पुणे या संस्थेच्या टीमने या पुस्तकाचे मार्मिक असे मुखपृष्ठ रेखाटले आहे.

शब्दांचे समर्थ हे पुस्तक वाचून वाचकांना नक्कीच निखळ आनंद मिळेल अशी आशा वाटते.

 

पुस्तकाचे नाव- सामर्थ्य शब्दांचे

लेखिका -डॉ. अंजुषा पाटील

प्रकाशक – वल्लरी प्रकाशन पुणे

मूल्य -200 रु.

प्रथम आवृत्ती -2025

 

डॉ. सुचिता पाटील

बोरिवली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button