धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांच्यावर कारवाईसाठी Varsha Gaikwad यांचे Devendra Fadnavis यांना थेट पत्र
ट्रेसपासिंग आणि नुकसान केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप

Mumbai : धारावीत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; Varsha Gaikwad यांचे Devendra Fadnavis यांना थेट पत्र

धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांशी कथित उद्धट वर्तन, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी आणि दादागिरीच्या आरोपांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

जास्मिन मिल रोड परिसरात सुरू असलेल्या मोदानी प्रकल्पामुळे मोठ्या वाहनांची सतत वर्दळ वाढली आहे. परिणामी रस्त्यांची दुरवस्था, धूळ-प्रदूषण आणि वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी या समस्येबाबत आवाज उठवला असता त्यांना दिलासा देण्याऐवजी धाकदपटशा करण्यात आल्याचा आरोप आहे.
https://www.facebook.com/share/r/1GNeHTH9KJ/
रस्त्यांवर पाणी शिंपडण्याच्या उपाययोजनेमुळे आधीच खराब झालेल्या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून चिखल आणि घसरड्या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बांधकामस्थळी नियमांचे पालन होत आहे का, असा साधा प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कार्यालयात बोलावण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र त्यानंतर ट्रेसपासिंग आणि नुकसान केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर स्वतः घटनास्थळी पोहोचलेल्या वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन उर्मट व दादागिरीचे असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली. “प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. धारावीत या प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



