जन्म-मृत्यू नोंदणी घोटाळा; संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापौर व मनपा आयुक्त यांना लिहिले पत्र

जन्म-मृत्यू नोंदणी घोटाळा; संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापौर व मनपा आयुक्त यांना लिहिले पत्र

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या काही वर्षांत हजारो नोंदींमध्ये संशयास्पद बदल करण्यात आले असून, यामुळे शासकीय नोंदणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, २०२४ ते २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यात आली. मात्र, यातील अनेक नोंदी सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवर न करता इतर माध्यमांतून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे.
याशिवाय, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून काही अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने नोंदींमध्ये बदल केल्याचेही समोर आले आहे. या घोटाळ्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय यंत्रणेत प्रवेश मिळवण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, तसेच संपूर्ण प्रणालीचे ऑडिट करून पारदर्शकता आणावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



