आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

के पश्चिम विभाग मधील अंधेरीतील चार हॉटेल आणि बारवर महानगरपालिकेची तोडक व जप्ती कारवाई

अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर पाऊल; ६ ते २० जूनदरम्यान विशेष तपासणी मोहीम

अंधेरीतील चार हॉटेल आणि बारवर महानगरपालिकेची तोडक व जप्ती कारवाई

अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर पाऊल; ६ ते २० जूनदरम्यान विशेष तपासणी मोहीम

 

मुंबई : दिल्ली येथे नुकत्याच घडलेल्या भीषण हॉटेल आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने शहरातील उपाहारगृह, हॉटेल आणि बार यांच्या अग्निसुरक्षेची व्यापक तपासणी सुरू केली आहे. अंधेरी परिसरातील चार हॉटेल आणि बारवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महानगरपालिकेकडून तोडक आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे व्यावसायिक आस्थापनांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

महानगरपालिकेच्या विविध विभागांसह मुंबई अग्निशमन दलाने संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. याच अनुषंगाने परिमंडळ चार मधील के पश्चिम विभाग मध्ये तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अग्निप्रतिबंधक यंत्रणा निकामी अवस्थेत आढळल्या, तर काही ठिकाणी आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अडवण्यात आले होते. तसेच काही आस्थापनांमध्ये परवानगीपेक्षा अधिक बांधकाम आणि सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.

म्हणून उपायुक्त डॉ भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या आदेशाने जुहू येथे मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे अंधेरी (पश्चिम) येथील वॉकमन बार, बोरा बोरा, चायना गेट, कारवन सेराई व होमटाऊन या हॉटेल आणि बारवर तोडक व जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आली

या संदर्भात अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, नागरिक, पर्यटक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. उपाहारगृह, हॉटेल आणि बार चालकांनी त्यांच्या परिसरातील अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा कायमस्वरूपी सुस्थितीत आणि कार्यरत ठेवणे अत्यावश्यक आहे.

 

त्यांनी पुढे सांगितले की, ०६ जून ते २० जून २०२६ या कालावधीत मुंबई अग्निशमन दलाकडून विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेत अग्निशमन दल, परवाना विभाग, इमारत व कारखाना विभाग, आरोग्य विभाग तसेच संबंधित प्रशासकीय विभाग सहभागी होणार आहेत.

 

महानगरपालिकेने सर्व हॉटेल व बार मालकांना अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन, जप्ती तसेच अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

 

दरम्यान, या कारवाईनंतर अंधेरी परिसरातील अनेक हॉटेल व बार मालकांनी आपल्या अग्निसुरक्षा यंत्रणांची तातडीने तपासणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button