पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू – राजा माने
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा आक्रमक इशारा; सर्व जिल्ह्यांत आंदोलनाची ठिणगी

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू – राजा माने
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा आक्रमक इशारा; सर्व जिल्ह्यांत आंदोलनाची ठिणगी!
महाराष्ट न्यूज 9: मुंबई, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि पत्रकारांवर लोकप्रतिनिधींकडून होणारे हल्ले आणि अपमानकारक वक्तव्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्याचा आणि अश्लील शिवीगाळ करत दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणी संबंधित खासदारावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्राला वैचारिक आणि पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे. येथे नेहमीच पत्रकारितेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान केला गेला आहे. मात्र, जबाबदार पदावर असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी देणे आणि अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. अशा प्रवृत्तींमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा असा खणखणीत ईशारा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीशभाऊ सावंत आणि राज्य महासचिव विकास भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे की, ”पत्रकार हे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. अशा वेळी लोकप्रतिनिधींकडून त्यांना धमकावले जाणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. शासनाने ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ची (Journalist Protection Act) कडक अंमलबजावणी करून अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की, जर संबंधित खासदारावर तातडीने कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात येईल.
खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. लोकशाहीचा बचाव करण्यासाठी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी शासनाने कडक पावले उचलावीत. पत्रकार संरक्षण संहितेचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी. पत्रकारांच्या हक्कासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संपूर्ण राज्यातील पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही राजा माने आणि संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



