CPAI तर्फे जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा; दिव्यांगांच्या कलागुणांचा गौरव
मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील मराठी भाषा भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

CPAI तर्फे जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा; दिव्यांगांच्या कलागुणांचा गौरव
सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया (CPAI) तर्फे जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील मराठी भाषा भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेरेब्रल पाल्सी तसेच इतर बहुविकलांगता असलेल्या व्यक्तींमध्ये जनजागृती, सामाजिक समावेशकता आणि त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला समाजसेविका प्रीती चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर अजित कुचेरिया सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संदीप अग्रवाल, मंजुषा सिंह, यशवंत मोरे, दुर्गेश नंदिनी, सनी भाटिया आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात CPAI तर्फे आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेत सहभागी विशेष शाळांच्या मुख्याध्यापकांचाही त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या सेरेब्रल पाल्सीग्रस्त गुणवंतांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
या वेळी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपली कला, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले. त्यांच्या सादरीकरणातून दिव्यांग व्यक्तींमध्ये असलेल्या सुप्त गुणांना योग्य संधी मिळाल्यास त्या आपल्या क्षमता प्रभावीपणे सिद्ध करू शकतात, हा संदेश देण्यात आला.

