सिने कलाकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
अभिनेत्री शिल्पा शेट्टी, संजय दत्त यांची उपस्थिती; भामला फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

सिने कलाकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ना. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
अभिनेत्री शिल्पा शेट्टी, संजय दत्त यांची उपस्थिती; भामला फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
मुंबई, दि. ०९ :
भामला फाऊंडेशनच्या वतीने हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील सिने कलाकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेमुळे क्रीडा, मनोरंजन आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

बांद्रा येथील विंग्ज स्पोर्ट्स मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेते संजय दत्त यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही विश्वातील अनेक नामवंत कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांमध्ये क्रीडावृत्तीला चालना देतानाच सामाजिक आणि पर्यावरण विषयक जनजागृती करण्याचा उद्देश भामला फाऊंडेशनने ठेवला आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी भामला फाऊंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक करत, “क्रीडा स्पर्धा आरोग्यासाठी उपयुक्त असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. कलाकारांच्या सहभागामुळे समाजात चांगला संदेश पोहोचतो,” असे मत व्यक्त केले.

भामला फाऊंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांनी ना. पंकजाताई मुंडे तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “मनोरंजन क्षेत्रातील कलाकार एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी योगदान देतात, ही बाब प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सुरूच राहील.”

उद्घाटनानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी काही वेळ स्टेडियममध्ये उपस्थित राहून पहिल्या सामन्याचा थरार अनुभवला. खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मैदानावर उपस्थित चाहत्यांनी कलाकारांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या स्पर्धेत विविध संघांद्वारे सिने आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकार आपले क्रिकेट कौशल्य सादर करणार असून, पुढील काही दिवस ही स्पर्धा रंगतदार सामन्यांनी गाजणार आहे.




