सर्वद फाउंडेशनच्या कविसंमेलनातून साहित्यिक ऐक्याचा जागर
२५ कवींनी कवितांद्वारे मांडली सामाजिक जाणीव, संजय गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली बोईसर येथे रंगले साहित्यिक पर्व

सर्वद फाउंडेशनच्या कविसंमेलनातून साहित्यिक ऐक्याचा जागर
२५ कवींनी कवितांद्वारे मांडली सामाजिक जाणीव, संजय गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली बोईसर येथे रंगले साहित्यिक पर्व

पालघर जिल्ह्यात साहित्यिक चळवळीला बळ देणारे आणि नव्या कविंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे सर्वद फाउंडेशन, पालघर जिल्हा शाखेच्या वतीने दि. 31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रभरातून आलेल्या कवींनी सहभाग घेतलेले भव्य कविसंमेलन बोईसर येथील अनंतचंद्र रिसॉर्ट, सालवड येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत श्री. संजय गवांदे यांनी भूषविले. त्यांच्या मार्गदर्शनात्मक भाषणाने संमेलनाला वैचारिक अधिष्ठान लाभले. कविता केवळ मनोरंजनासाठी नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विविध विषयांवर कवितांचा आविष्कार
संमेलनात २५ कवींनी आपापल्या कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. सामाजिक वास्तव, स्त्री-पुरुष समानता, निसर्ग, प्रेम, शेतकरी प्रश्न, मानवी संवेदना, ग्रामीण जीवन आणि समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थिती अशा विविध विषयांवर आधारित कवितांनी संमेलनात साहित्यिक रंगत निर्माण केली. प्रत्येक कवितेला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.
प्रभावी सूत्रसंचालन आणि शिस्तबद्ध आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली राऊत यांनी अत्यंत संयत, प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले. वेळेचे अचूक नियोजन आणि कवींशी साधलेला संवाद यामुळे कार्यक्रम अधिकच आकर्षक ठरला.
साहित्य क्षेत्रासाठी सर्वदचा सातत्यपूर्ण प्रयत्न
यावेळी सर्वद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,
“कविनी, लेखक आणि साहित्यिक एकत्र येऊन साहित्य क्षेत्र अधिक सक्षम आणि व्यापक व्हावे, यासाठी सर्वद फाउंडेशन सातत्याने अशा प्रकारचे साहित्यिक उपक्रम आयोजित करत आहे. नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे आणि साहित्य चळवळ ग्रामीण व निमशहरी भागात पोहोचावी, हाच आमचा उद्देश आहे.”
साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती
कविसंमेलनाला पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि राज्यातील विविध भागांतून आलेले साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कविसंमेलनामुळे पालघर जिल्ह्यातील साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, साहित्यिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली



