आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईमुंबई चे रस्तेविशेषसामाजिक

मुंबईतील पावसाळापूर्व नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांविषयीची आढावा बैठक संपन्न

महापौर श्रीमती रितू तावडे यांच्‍या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालय येथे आज पार पडली बैठक

मुंबई – मुंबईतील पावसाळापूर्व नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांविषयीची आढावा बैठक महापौर श्रीमती रितू तावडे यांच्‍या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालय येथे आज पार पडली. मुंबईचे उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्‍थायी समिती अध्‍यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्‍यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्‍यक्ष श्रीमती संध्‍या दोशी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे यांच्‍यासह सर्व परिमंडळ सहआयुक्‍त/ उप आयुक्‍त, सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त व पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मुंबई महानगरातील प्रमुख नाले व लहान नाले यातून गाळ काढण्‍याची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. त्‍यासाठी आवश्‍यक मनुष्‍यबळ व संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. प्रशासकीय विभाग कार्यालय (Ward Ofiice) आणि मध्‍यवर्ती यंत्रणा (Central Agency) यांच्‍यात समन्‍वय राखून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत.

लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांना प्रत्‍येक कामाच्‍या टप्‍प्‍याची नियमित माहिती द्यावी. ज्‍या नाल्‍यांची स्‍वच्‍छता सुरू आहे त्‍या ठिकाणी संबंधित नाल्‍याची लांबी – रूंदी, गाळ काढण्‍याचे परिमाण, कालावधी, कंत्राटदाराचे नाव आणि संबंधित अभियंत्‍याचा संपर्क क्रमांक आदींची माहिती दर्शविणारा फलक कार्यस्‍थळी लावावा. नाल्‍यातून काढलेल्‍या गाळाची ४८ तासात योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी.

नाले स्‍वच्‍छतेच्‍या कामात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढण्‍यापासून ते क्षेपणभूमीवर त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यापर्यंतच्‍या सर्व टप्‍प्‍यांचे छायाचित्रण, चित्रिकरण अनिवार्य करावे, असे विविध निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.

 

सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील विविध सूचना केल्‍या.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. बांगर यांनी पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग आणि रस्‍ते व वाहतूक विभागामार्फत सुरू असलेल्‍या कामकाजाची माहिती दिली.

तर, महापौर श्रीमती रितू तावडे यांच्‍यासह सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेल्‍या निर्देशांचे सर्व सह आयुक्‍त / उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी काटेकोरपणे पालन करावे. नगरसेवक यांसमवेत संवाद साधावा. त्‍यांच्‍या तक्रारींचे निराकरण करून प्रतिसाद द्यावा, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. शर्मा यांनी दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button