आमची मुंबईआरोग्यमहाराष्ट्रमुंबईविशेष

पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची प्रकृती खालावली मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात तातडीने दाखल

*सततच्या दौऱ्यांनी तब्येतीवर परिणाम जयदीप भाई कवाडे यांची प्रकृती खालावली

मुंबई – पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात सुरू असलेल्या त्यांच्या अविरत राजकीय आणि सामाजिक दौऱ्यांमुळे शारीरिक थकवा आणि प्रकृतीवर परिणाम झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून पक्षाचे प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दलित, वंचित, मागास आणि अल्पसंख्याक समाजासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम, मेळावे आणि बैठका यशस्वीरित्या पार पाडून जयदीप कवाडे यांनी पक्षाची मोट बाधण्याचे कार्य ते करीत आहे. या कार्यक्रमांमध्ये ते स्वतः सहभागी होत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत होते. परंतु, सततचा प्रवास, धकाधकीचे जीवन आणि शरीराला पुरेसा आराम न मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती गेल्या काही आठवड्यांपासून कमजोर होत होती. बुधवारी मुंबईत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. श्वास घेण्यात त्रास होणे, थकवा आणि अशक्तपणा या तक्रारी वाढल्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. रोहित बर्मन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्षाचे प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप भाई कवाडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून, वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. येत्या 2 ते 3 दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. जयदीप कवाडे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त समजताच, राज्यभरातून त्यांचे असंख्य कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी केली आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्या पोस्टचा वर्षाव सुरू आहे. अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या असून, काही भागांत सामूहिक वंदनांचे आयोजन करण्यात आले आहे. जयदीप भाई कवाडे हे केवळ राजकीय नेते नसून, एक सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीने अनेक ठिकाणी प्रभावी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना अनेक राजकीय नेत्यांनीही सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. विविध पक्षांतील नेत्यांनी त्यांच्या लवकरात लवकर तब्येत सुधारावी, अशी भावना व्यक्त करत राजकारणाच्या पलीकडेही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. जयदीप कवाडे यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत व्हावी हीच कार्यकर्त्यांची आणि जनतेची अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने ज्या वेगाने समाजात काम केले, ते पाहता त्यांची तब्येत पूर्ववत होऊन पुन्हा ते कार्यरत व्हावेत, अशी भावना संपूर्ण राज्यभरातून व्यक्त होत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button