कांदिवलीत फेरीवाल्यांचा बीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला; आमदार अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप
समता नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ५ ते ६ जणांना केली अटक

कांदिवलीत फेरीवाल्यांचा बीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला; आमदार अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : कांदिवली परिसरात शुक्रवारी संध्याकाळी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महापालिकेचे कर्मचारी कांदिवली येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे जमलेल्या मोठ्या जमावाने अचानक पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चाल करून जात त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हल्ला करणारे फेरीवाले हे क्रांती नगर मधील मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून 12 ते 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणात समता नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ५ ते ६ जणांना अटक केली असल्याची माहिती समोर येत असून
दरम्यान, कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवर गंभीर आरोप करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.



