आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसंपादकीय

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत सुमारे ५५ टक्के मतदान

उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी १,७०० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

मुंबई :गेल्या महिनाभर सुरू असलेल्या जोरदार प्रचारानंतर गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डसाठी मतदान पार पडले. सकाळी मतदानाचा वेग मंद होता, मात्र दुपारनंतर मतदानात लक्षणीय वाढ झाली. अखेर मुंबईत सुमारे ५५ टक्के मतदान झाले. २०१७ च्या बीएमसी निवडणुकीतही साधारण एवढेच मतदान झाले होते.
नऊ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीनंतरही मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शहरात ४१.०८ टक्के मतदान झाले होते.
मुंबईत एकूण १,७०० उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. शहरात १ कोटी ३ लाख ४४ हजार मतदार असून त्यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष आणि ४८ लाख २६ हजार ५०९ महिला मतदार आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य आता बंद ईव्हीएममध्ये बंद झाले असून आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.


गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ७.०३ टक्के मतदान झाले. पुढील दोन तासांत म्हणजे साडेअकरा वाजेपर्यंत मतदान १७.७३ टक्क्यांवर पोहोचले. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान २९.२२ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत ४१.०८ टक्के झाले. मतदानाची वेळ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होती. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सायंकाळपर्यंत मुंबईत सुमारे ५५ टक्के मतदान झाले.

मतदानाची सुरुवात जरी संथ झाली असली तरी सायंकाळपर्यंत मतदारांचा सहभाग वाढताना दिसला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची नावे यादीत न सापडल्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दुहेरी मतदारांच्या मुद्द्यावर राजकारण तापले असले तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई दिवसभर चर्चेचा विषय ठरली.

चार वर्षांची प्रतीक्षा संपली चार वर्षांपासून रखडलेल्या बीएमसी निवडणुकीची प्रतीक्षा अखेर गुरुवारी संपली. बीएमसीची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना काळ आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित राहिल्यामुळे निवडणूक लांबली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

२५ वर्षांनंतर सत्तांतर?
गेल्या २५ वर्षांपासून बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक मोठे आव्हान ठरली आहे. शिवसेनेतील फूटीनंतर होणारी ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे २० वर्षांनंतर झालेले युतीचे राजकारणही चर्चेचा विषय ठरले. संपूर्ण निवडणूक ‘मराठी विरुद्ध अमराठी’ या मुद्द्यावर रंगली. “महापौर मराठीच होणार” या घोषणेवर निवडणूक लढवली गेली.

एकीकडे महायुती, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची आघाडी — अशा परिस्थितीत २५ वर्षांनंतर सत्तांतर होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर आलेल्या एग्झिट पोलनुसार मुंबईत सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे. आता आजचा निकालच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर नेमके कोणाचा झेंडा फडकणार हे ठरवणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button